लखनऊ: काँग्रेसच्या महासचिवपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी यांनी सोमवारपासून उत्तर प्रदेशात प्रचाराचा शुभारंभ केला. लखनऊमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रोड शो मध्ये प्रियंका गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधियाही सहभागी झाली होती. प्रियंका यांचा हा पहिलावहिला रोड शो आज दिवसभरात चर्चेचा विषय ठरला. या रोड शोच्या वेळी घडलेला एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बसच्या टपावरून हा रोड शो सुरु होता. यावेळी प्रियंका आणि राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती. हे दोघेही बसच्या टपावरून लोकांना हात दाखवत होते. मात्र, एके ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या वीजेच्या तारांमुळे राहुल व प्रियंका यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. एरवी या वीजेच्या तारांखालून बस सहजपणे जाऊ शकते. मात्र, रोड शो साठी काँग्रेसचे नेते बसच्या टपावर उभे राहिल्याने या वायर्स त्यांच्या डोक्याला लागत होत्या. अखेर तेथून पुढे जाण्यासाठी राहुल व प्रियंका यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांना बसच्या टपावरच बसकण मारावी लागली. मात्र, तरीही काही वायर्स त्यांच्या डोक्याला लागत होत्या. तेव्हा राहुल यांच्या अंगरक्षकांनी हातात मिळेल त्या साधनाने वायर्स उचलून धरल्या. मात्र, हा सगळा प्रकार सुरु असताना राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांना बराचवेळ खाली बसून राहावे लागले. या प्रकारानंतर राहुल आणि प्रियंकांनी बसऐवजी कारमधून उर्वरित टप्पा पार करायचा निर्णय घेतला.



सोमवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियंका तीन दिवसांमध्ये दररोज १२ तास वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. याशिवाय, लखनऊमध्ये त्यांची एक सभाही होणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी यांचा हा प्रचार काँग्रेससाठी फायदेशीर ठरण्याची आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.