नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' या आक्षेपार्ह वक्तव्यावरून लोकसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. भाजप खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा नेता इतरांना भारतीय महिलांवर बलात्कार करा, असे आवाहन करताना दिसत आहे. राहुल गांधी यांना देशवासियांना हाच संदेश द्यायचा आहे का, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. राहुल गांधी यांच्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी गुरुवारी झारखंड येथील प्रचारसभेत हे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा संदर्भ देत मोदी सरकारवर आसूड ओढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची हाक दिली होती. मात्र, देशातील आजची परिस्थिती पाहता त्याचे रूपांतर 'रेप इन इंडिया'त झाल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली होती. 



उत्तर प्रदेशात मोदींच्या पक्षाचा एक आमदार मुलीवर बलात्कार करतो. यानंतर त्या मुलीचा अपघातही होतो. मात्र, नरेंद्र मोदी याविषयी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत. या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होत असल्याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.