मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी आपण एक महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं ट्विट केलं... आणि संपूर्ण मीडिया - नागरिकांचं लक्ष पंतप्रधानांच्या या ट्विटनं वेधून घेतलं. त्यानंतर मोदींनी भारतानं अंतराळात एन्टी सॅटेलाईट  (ASAT) द्वारे एक लाईव्ह एलईओ सॅटेलाईट (Low Earth Orbit setelite) पाडल्याचं जाहीर करत वैज्ञानिकांचं कौतुक केलं. शत्रूकडून हेरगिरी करणाऱ्या किंवा नागरी कामांकरिता वापर करण्यासाठी जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र काढणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जातो, अशा उपग्रहांना रोखण्यासाठी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' ही उपयोगी ठरणार आहे. अशी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' आत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता ही क्षमता आत्मसात करणारा भारत हा चौथा देश ठरलाय. परंतु, लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी भारताचं हे यश जाहीर करण्यासाठी साधलेल्या वेळेवर काँग्रेसनं निशाणा साधलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर 'डीआरडीओ'च्या कामाचा आपल्याला गर्व असल्याचं म्हटलंय. सोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींना 'जागतिक रंगभूमी दिना'च्याही शुभेच्छा दिल्यात. 



राहुल गांधींसोबत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही आपली प्रतिक्रिया देताना 'मोदी जवळपास तासभर टीव्ही स्क्रीन व्यापून राहिले, त्यांनी देशाचं लक्ष बेरोजगारी आणि ग्रामीण समस्यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांपासून हटवलं' असं म्हटत टीका केलीय. अखिलेश यादव यांनीही डीआरडीओ आणि इस्रोला 'हे यश तुमचंच आहे', असं म्हणत गौरव केलाय.



याशिवाय काँग्रेसनंही 'मिशन शक्ती'साठी डीआरडीओला शुभेच्छा दिल्यात. पंडित जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत अंतराळ तंत्रज्ञान श्रेत्रात अग्रणी असल्याचं म्हटलंय. 



काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही डीआरडीओला शुभेच्छा देताना या मिशनचा पाया यूपीए सरकारच्या काळात २०१२ साली घालण्यात आल्याचं सांगितलंय. भारतासाठी हा एक गौरवाचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलंय.