Rahul Gandhi Denied Entry In Temple: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. नगांव जिल्ह्यातच असामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानदेखील आहे. राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी बर्दोवा येथे जाणार होते. मात्र, आता तिथे जाण्यापासून रोखल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, प्रशासनाने मंदिरात जाण्याची परवानगी सुरुवातीला दिली होती. मात्र आता ती परवानगी नाकारण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करण्यावरुन राहुल गांधी यांची पोलिस प्रशासन आणि अधिकाऱ्यांसोबतही बाचाबाची झाली होती. त्यामुळं काही काळ भारत जोडो यात्रेत तणावाचे वातावरण होते. मी इथे आलो आहेच तर मला फक्त देवासमोर हात जोडायचे आहेत, असं सांगून राहुल यांनी परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना दुपारी 3 नंतर तुम्ही मंदिरात दर्शनाला जाऊ शकतात, असं उत्तर दिल्याचा दावा काँग्रेस करत आहे. 



राहुल गांधी यांनी या सगळ्या प्रकरणानंतर पंतप्रधान मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. आज फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्याची परवानगी आहे, असं टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेसने पुढे म्हटलं आहे की, अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना सांगितले की आमच्याकडे तसे आदेश आहेत. त्यावर गांधी यांनी मी अशी कोणती चुक केलीये की तुम्ही मला मंदिरात जाण्यापासून रोखताय? असा सवाल केला आहे. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परवानगीदेखील दाखवली आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्याचा दावा त्यांनी केला आहे. 



पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तिथेच धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसंच, आम्हाला का अडवलं जात आहे, याचं उत्तर द्या, असा सवाल ही राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांना सातत्याने विचारत आहेत. आम्ही बळजबरीने मंदिरात शिरणार नाही. ती आमची वृत्ती नाही. सक्तीने काही करणं हे आम्ही करणार नाही, असं म्हणत प्रवेशद्वारापाशीच कार्यकर्त्यांसह राहुल यांनी आंदोलन सुरु केलं आहे.