नवी दिल्लीः लडाखमधील चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड केली. यावेळी राहुल गांधींनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. जेव्हा जेव्हा देश भावुक होतो, त्याचवेळी फाइल्स गायब झाल्या आहेत, असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांचा दाखला देत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा केला होता. यानंतर ही कागदपत्रे संबंधित संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आली होती. यादरम्यान भारतीय बँकांना चुना लावून फरार झालेल्या विजय मल्ल्या याच्या खटल्यासंदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला सुनावणी पुढे ढकलावी लागली. आता या खटल्याची सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे.



हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारला लक्ष्य केले. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोक्सी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.