`म्हणून अर्ध्या रात्री चौकीदारानं सीबीआय संचालकांना हटवलं`
एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांनाही रातोरात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.
नवी दिल्ली : एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांनाही रातोरात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. त्यांच्या जागी नागेश्वर राव यांच्याकडं अंतरिम संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्याशिवाय आणखी १३ अधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यायत. या सगळ्या वादाची स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
तर राफेल विमान खरेदी गैरव्यवहाराची चौकशी टाळण्यासाठीच अर्ध्या रात्री चौकीदारानं सीबीआय संचालकांना हटवलं, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीकेची तोफ डागलीय.
गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये आलोक वर्मा विरूद्ध राकेश अस्थाना असा वाद धुमसतोय. राकेश अस्थाना आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर ३ कोटी ८८ लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आलोक वर्मांनी एका उद्योजकाकडून २ कोटींची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांनी थेट कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवून केलाय.
या आरोप-प्रत्यारोपांमुळं सीबीआयची विश्वासार्हताच धोक्यात आल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः त्यात लक्ष घातल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सरकारच्या कारवाईविरोधात आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
सीबीआय हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं असल्याची टीका नेहमीच होते. मात्र दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवरच लाचखोरीचे आरोप केल्यानं सीबीआयची प्रतिष्ठा पुरती धुळीला मिळालीय. देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेवरील हे डाग सरकार कसे पुसून काढणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.