भोपाळ : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तीन राज्यात काँग्रेसची सत्ता आलेय. दरम्यान, मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही. दरम्यान, नेता निवडीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार आता पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मध्य प्रदेश काँग्रेस सरकारच्या नेता निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपाळ येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात बैठक झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. प्रदेश नेतेही उपस्थित होते. आवेळी ज्येष्ठ आमदार आरिफ अकिल यांनी नेता निवडीचा प्रस्ताव मांडला. मात्र, कोणाला नेता करावे, त्यावर निर्णय झाला नाही. त्यावर सहमतीने ठरले की हा निर्णय केंद्रीय हाय कमांडने घ्यावा. त्यानुसार आता पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेस सरकारच्या नेता निवडीवरून पक्षात स्थानिक स्तरावर शीतयुद्ध दिसून येत आहे. 



प्रदेश अध्यक्ष कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात जोरदार चूरस पाहायला मिळत आहेत. राज्यातील युवा कार्यकर्त्यांची मागणी वजा शक्तीप्रदर्शन की ज्योतिरादित्य यांना मुख्यमंत्री करावे, असे दिसून आले. भोपाळ मध्ये आज दिवसभर बाईक रॅलीच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांची वातावरण निर्मिती केली. 


ज्योतिरादित्य शिंदे युवा चेहरा आहे.कमलनाथ पक्षात ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. राज्यातील स्थानिक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा कमलनाथ यांना आहे. निवडणुकीत प्रचार आणि व्यूहरचनेची धुरा कमलनाथ यांच्याकडे होती तर ज्योतिरादित्य आक्रमक शैलीचे असून ते युवा वर्गात लोकप्रिय आहेत. 


दरम्यान, ज्योतिरादित्य यांनी ट्विट केलेय, नेता निवडीचा निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील. ज्योतिरादित्य शिंदे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष करताना दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या पाठी आपलं वजन लावल्याचे दिसून येत आहे. ज्योतिरादित्य यांचा पत्ता कापण्यासाठी ही खेळी होती, अशी चर्चा आहे. मात्र, स्थानिक ज्येष्ठ नेत्यांना ज्योतिरादित्य शिंदे नकोत, त्यामुळे नेता निवडीचा पेच उभा राहिला.


निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांच्या कडक सूचनांमुळे प्रदेश नेत्यांनी आपआपले मतभेद तात्पुरते बाजूला ठेवले होते. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत नेता निवडीचे अधिकार एकमताने राहुल गांधी यांना देण्यात आल्याने, आता नेतृत्व काय निर्णय घेतं याकडे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं लक्ष लागले आहे.