नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने नव नवे डाव आखण्यात सुरुवात केली आहे. राहुल यांनी पहिल्यांदा 'प्रियंका' अस्त्र बाहेर काढले. त्यांनी आपली मोठी बहीण प्रियंका गांधी - वाड्रा यांना काँग्रेसचे महासचिव पद दिले. त्यानंतर पूर्व उत्तर प्रदेशची संपूर्ण जबाबदारी दिली. प्रियंका गांधी राजकारणात आल्यानंतर काँग्रेसची जोरदार चर्चा सुरु झाली. काँग्रेसने त्याआधी तीन राज्यात आपली सत्ता आणली. आता लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी नवे आखाडे बांधत आहेत. काँग्रेस पक्षाने मोठी खेळी खेळली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका टास्क फोर्स अर्थात कृती दलाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानवर २०१६ मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे निवृत्त ले. जनरल डी. एस. हुड्डा हे या कृती दलाचे नेतृत्व करणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी काँग्रेसमध्ये नव चैतन्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते नव नवीन निर्णय घेत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी राहुल यांनी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. हे कृती दल देशाच्या सुरक्षेसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहे. देशातील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून हुड्डा एक डॉक्युमेंट तयार करतील, अशी माहिती काँग्रेसने टि्वटरद्वारे दिली आहे.



२०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर या सर्जिकल स्ट्राइकनंतर केंद्र सरकारने जोरदार प्रचार केला होता. सर्जिकल स्ट्राइकचा इतका गाजावाजा करायची आवश्यकता नाही, असे हुड्डा यांनी म्हटले होते. हुड्डा यांच्या या विधानानंतरराहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसने सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन केली आहे. काँग्रेसचे हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.