भीमा कोरेगाव हिंसाचारावर राहुल गांधींचं ट्विट
कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली : कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे दलितविरोधी असल्याचं भीमा-कोरेगावच्या घटनेवरून सिद्ध झालं आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. दलित हे भारतीय समाजात तळालाच राहावेत ही संघ आणि भाजपची विचारधारा आहे. उना, रोहित वेमुला आणि आता भीमा कोरेगाव हे याचं उदाहरण आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
उद्या महाराष्ट्र बंदची हाक
'संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला', असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, 'घडलेल्या प्रकाराबद्दल राग तर आहेच. पण, कोणही कायदा सुव्यवस्था मोडून नये. राज्यात शांतता नांदली पाहिजे, असे अवाहन करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.'
भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री
भीमा कोरेगाव प्रकरणी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत पावलेल्या युवकाच्या हत्येची सीआयडी चौकशी होणार असेही ते म्हणाले.
तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली. तसेच सोशल मीडियातून अफवा पसरवणा-यांवरही कारवाई केली जाणार आहे. काही जणांना नुकसान भरपाई सुद्धा दिली जाईल असे ते म्हणाले.