Rahul Gandhi PC : लोकसभा सदस्य अर्थात खासदारकी रद्द झाल्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 1 वाजता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, काँग्रेसने जनआंदोलन करण्याची घोषणा केली आहे. खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. त्याचबरोबर आज काँग्रेस कार्यकर्ते देशभरात आंदोलन करणार आहेत. या प्रकरणी पुढील लढा देण्यासाठी काँग्रेसने 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समितीच्या सदस्यांची नावे लवकरच जाहीर होतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला महिनाभरात सोडावा लागू शकतो. राहुल गांधी 2004 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. 


गुरजारमधील सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका ठेवल्यानंतर 2019 च्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या जेलची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी त्यांचे संसद सदस्य रद्द केले. दरम्यान, सूरत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करुन उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली असताना तात्काळ कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 



दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या कारवाईनंतर राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थानाचा अधिकार नाही. नियमानुसार त्यांना आयोगाच्या आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत सरकारी बंगला रिकामा खाली करावा लागणार आहे.


प्रियंका गांधी यांनीही खाली केला होता बंगला


राहुल गांधी यांच्या भगिनी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना जुलै 2020 मध्ये लोधी इस्टेटमधील त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करावा लागला होता. कारण त्यांना देण्यात आलेली सुरक्षा कमी केल्यानंतर त्यांना बंगला खाली करावा लागला होता. सुरक्षा कमी झाल्याने त्यांना हा बंगला सोडवा लागला. राहुल गांधी यांच्या दोषी आणि अपात्रतेविरुद्धची राजकीय आणि कायदेशीर लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.


प्रियंका यांचा जोरदार हल्लाबोल


प्रियंका यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारलाआहे. मोदी यांनी जेव्हा काश्मिरी पंडितांचा अपमान केला तेव्हा त्यांची खासदारकी का रद्द करण्यात आली नाही. तसेच गौतम अदानी यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केल्यावर मोदी एवढे का संतापले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.  मोदीजी तुमच्या चमच्यांनी एका शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटले. तुमच्या एका मुख्यमंत्र्याने राहुल गांधी यांचे वडील कोण आहेत असा प्रश्न विचारला. तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभी लोकांसमोर, हुकूमशाहांसमोर आम्ही कधीच झुकत नाही आणि कधी झुकणारही नाही. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करु शकता, असे थेट आव्हान प्रियंका यांनी दिलेय.