नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले. 'न्यूज १८ तामिळ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी अजून कोणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात काँग्रेस पक्षाला अशाप्रकारे पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करण्याची कोणतीही गरज नाही. कधीही पंतप्रधानपदासाठी चर्चेत नसलेले नेतेही काँग्रेसच्या काळात पंतप्रधान झाले आहेत, असे चिदंबरम यांनी म्हटले. 


राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान होण्याची तयारी दाखवली होती. मात्र, सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येणे, हीच आपली प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आम्ही सहकारी पक्षांशी केलेल्या चर्चेअंती दोन निर्णय घेण्यात आले. सर्वप्रथम सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करायचा. त्यानंतर पंतप्रधान कोण होणार हे ठरवायचे. जर सहकारी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी आपल्या नावाला पसंती दिली तर आपण पंतप्रधान बनण्यास तयार आहोत, असे राहुल यांनी सांगितले होते.