मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कोरोना प्रादुर्भावाच्या (Coronavirus in India) संदर्भात पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात राहुल म्हणाले की, देशातील कोरोना म्यूटेशनचा सातत्याने मागोवा घेण्यात यावा. सर्व म्यूटेशनवर लवकरात लवकर व्हॅक्सिन उपलब्ध होण्याबाबत चाचणी घेण्यात यावी. तसेच देशातील सर्व लोकांना लवकर लस देण्याची व्यवस्था केली पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या अपयशामुळे देशावर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेवली आहे. अशा परिस्थितीत गरिबांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, असे राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे. जेणेकरुन गरिब लोकांना गेल्यावर्षी प्रमाणे  त्रासातून जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.


'देश कोविड त्सुनामीच्या विळख्यात आहे'


पत्रात राहुल गांधी म्हणाले की, 'मला पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्यास भाग पाडले गेले आहे, कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या दिशेने आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेबाबत आपले सर्वात मोठे प्राधान्य असले पाहिजे. या देशातील लोकांना या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. '


ते म्हणाले, 'जगातील प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती भारतीय आहे. आता या रोगापासून हे ज्ञात आहे की, आपला आकार, अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात कोरोना विषाणूचे स्वरुप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे. मला भीती वाटते की आता 'कोरोनाची दुसरी लाट' (Double mutant)किती भयानक आहे, हे आपण पाहत आहोत. आणि 'तिसरी लाट' (Triple mutant)कदाचित एक मोठे संकट असू शकते. '


लसीकरणासाठी कोणतेही स्पष्ट धोरण नाही - राहुल


अनियंत्रित पद्धतीने या विषाणूचा प्रसार केवळ आपल्या देशातील लोकांसाठीच नाही, तर उर्वरित जगासाठी देखील जीवघेणा ठरणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधानांना सूचना केली की, “या विषाणूचा आणि त्यासंबंधी विविध प्रकारांचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घेणे. सर्व नवीन म्यूटेशन विरोधात लसींचे प्रभावाचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. सर्व लोकांचे त्वरीत लसीकरण केले पाहिजे. 



कोविड विरुद्ध लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे कोणतेही स्पष्ट धोरण नाही आणि व्हायरस पसरत असताना सरकारने साथीच्या रोगावर विजय मिळविल्याचे घोषित केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की भारत सरकारच्या अपयशामुळे आज राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन अपरिहार्य दिसत आहे.


या परिस्थितीचा विचार करता, दुर्बल घटकातील लोकांना आर्थिक मदत आणि खाद्यान्न वस्तू उपलब्ध करुन द्याव्यात. जेणेकरून लॉकडाऊन दरम्यान गोरगरिबांना भोगावे लागणारे त्रास सहन करावे लागणार नाही. गेल्यावर्षी कोरोना साथीच्या विरुद्ध लढ्यात पूर्ण सहकार्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. या संकटात वेगवेगळ्या राजकीय पक्षांना विश्वासात घेतले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकजण एकत्रितपणे काम करुन भारताला सुरक्षित ठेवू शकेल, असे पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे.