नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी १०-१५ दिवस सुट्टीवर जायची इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर मी कैलाश मानसरोवरच्या धार्मिक यात्रेवर जाईन असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या जन आक्रोश रॅलीचं नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा राहुल गांधींनी ही इच्छा व्यक्त केली. या रॅलीदरम्यान विमानमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडावरही त्यांनी भाष्य केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान आश्वासनं तर देतात पण त्यांच्या शब्दातला खरेपणा शोधायला मेहनत घ्यावी लागते, असं राहुल गांधी म्हणाले. मोदी जिकडे जातात तिकडे नवी आश्वासनं देतात पण लोकं या आश्वासनांमधली सत्यता पडताळतात. हा माणूस एवढी आश्वासनं देतो पण यामागची सत्यता काय आहे असा विचार सामान्य माणूस करतोय, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं.


मनमोहन सिंग यांचीही टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. राहुल गांधींच्या नेतृत्वात देश बदलेल, असा विश्वास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बोलून दाखवला. मोदी सरकार त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे. महागाई वाढली आहे. तरुणांना रोजगार नाही. दलित, अल्पसंख्याक आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. मोदी सरकारचं याकडे लक्ष नसल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला आहे.


रॅलीमध्ये काँग्रेसचे दिग्गज सहभागी


काँग्रेसच्या जन आक्रोष रॅलीमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते.


मोदींनी केला होता राहुल गांधींना फोन


कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या राहुल गांधींच्या विमानाचा अपघात होता होता वाचला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना फोन करून त्यांची विचारपुस केली. गुरुवारी राहुल गांधी एका विशेष विमानानं दिल्लीहून हुबळीला पोहचेल. विमान जमीनीवर उतरत असताना त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पण हा तांत्रिक बिघाड नसून त्यामागे घातपाताची शंका काँग्रेसनं व्यक्त केलीय. याप्रकरणी डीजीसीए मार्फत चौकशी व्हावी यासाठी पायलटविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.


राहुल गांधींबरोबर विशेष विमानात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनंही कर्नाटक पोलीस महासंचालकांकडे आणि महा निरिक्षकांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केलीय. विद्यार्थ्यानं दिलेल्या तक्रारीत विमान उतरतेवेळी हवामान स्वच्छ होतं. याप्रकरणी डीजीसीएनं चौकशीचे आदेश दिले आहेत.


मात्र राहुल गांधी यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री हुबळी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा घातपाताचाही प्रयत्न असू शकतो, असे तक्रारीत नमूद केले आहे. राहुल गांधी  विधानसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटक दौर्‍यावर आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते दिल्लीवरून विमानाने निघाले.


साडेअकराच्या सुमारास त्यांच्या विमानाने हुबळी गाठली. मात्र दोनदा प्रयत्न करूनही  विमान हुबळी विमानतळावर उतरू शकले नाही. विमानाची ऑटो पायलट सुविधा निष्क्रिय झाली होती. शिवाय विमान हवेतच अस्थिर बनले होते. शेवटी तिसर्‍या प्रयत्नात विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले.