नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे दशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवलं असल्यानं देशभरातील रेल्वे सेवा आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंदच राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील काही भागात २० एप्रिलला आढावा घेऊन लॉकडाऊन सशर्त आणि अंशतः शिथील करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना दिलेल्या संदेशात सांगितलं आहे. त्यामुळे काही भागात मर्यादित स्वरुपात उद्योग, व्यवसाय, वाहतूकही सुरु होऊ शकेल. मात्र रेल्वे आणि विमानसेवा बंदच राहणार असल्याचं रेल्वे प्रशासन आणि डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


रेल्वे प्रशासनानं याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, भारतीय रेल्वेच्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि प्रीमियम गाड्या ३ मे रात्री १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय उपनगरीय लोकल सेवा, तसेच कोलकाता मेट्रो रेल्वेची वाहतूक सेवा याच कालावधीपर्यंत बंद राहील. कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूकही ३ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


देशभरात अत्यावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मालगाड्या आणि पार्सलसेवा मात्र सुरु राहणार आहे.


दरम्यान, ३ मेपर्यंत प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याने या कालावधीत प्रवासासाठी ज्यांनी तिकीटं काढलेली असतील ती रद्द करण्यात आली आहेत. तसेच रेल्वेची तिकीट बुकिंग सेंटर्सही ३ मे पर्यंत बंदच राहणार आहेत. दरम्यान, रद्द झालेल्या रेल्वे तिकिटांचे पैसे जूनपर्यंत परत केले जाणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं आधीच जाहीर केलं आहे.


तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवाही ३ मेच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत बंदच ठेवण्यात येणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं कळवलं आहे. मात्र अत्यावश्यक मालवाहतुकीसाठी डीजीसीएच्या परवानगीने कार्गो सेवा सुरु राहील. 


 



याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले त्या रात्रीपासूनच म्हणजे २४ एप्रिलपासून देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.  २१ दिवसांचा लॉकडाऊन कालावधी आणखी वाढवल्यानं आता देशभरातील जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे सेवा बंदच राहणार आहे.