Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) भीषण तिहेरी रेल्वे अपघातातील शनिवार पर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातील जखमींची संख्या 1000 हून अधिक झाली आहे. दोन पॅसेंजर ट्रेन बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (bengaluru howrah sf express) आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (coromandel express) आणि एक मालगाडी रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता वर्तवण्यात येत असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnaw) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर मोठे वक्तव्य केले आहे. आम्हाला अपघाताचे कारण कळले आहे. त्याचा तपास पूर्ण झाला आहे. लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रविवारी सकाळी पुन्हा अश्विनी वैष्णव यांनी बालासोर येथील अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार काम वेगाने सुरू असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. "काल रात्री ट्रॅकचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आज, एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व बोगी काढण्यात आल्या आहेत. सर्व मृतदेह डब्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काम वेगाने सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंत सामान्य मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असे अश्विनी वैष्णव म्हणाले.


"रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. अपघाताचे कारण शोधून काढण्यात आले असून जबाबदार व्यक्तींची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे हा अपघात झाला आहे," असेही अश्विनी म्हणाले.


बालासोर दुर्घटनेला 37 तास उलटून गेले असून बचावकार्य पूर्ण झाले आहे. आता ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या 382 जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर पुन्हा रेल्वेमंत्री अपघातस्थळी पोहोचले होते. रेल्वेमंत्र्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. शक्य तितक्या लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.



नेमकं काय घडलं?


ट्रेन क्रमांक 12481 कोरोमंडल एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मुख्य मार्गावरून जात होती, त्याचवेळी अप लूप मार्गावरील मालगाडीला धडकली. त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले तर 3 डबे डाऊन मार्गावर गेले. त्याचवेळी डाउन मार्गावरील 12864 यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहंगा बाजार स्थानकावरून जात असताना कोरोमंडलच्या डब्यांना धडकली. यानंतर हावडा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. अपघाताच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकापूर्वी मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनवर गेली होती, जिथे ती आधीच थांबलेल्या मालगाडीला धडकली.


दरम्यान, विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केले आहे. लोकांचे प्राण वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे, असे रेल्वेमंत्री म्हणाले. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया रविवारी भुवनेश्वरला पोहोचले आहेत. त्यांनी कटक येथील एम्स आणि मेडिकल कॉलेजला भेट दिली. जखमींना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय मदतीचा ते आढावा घेणार आहेत.