जवळचा प्रवास असो किंवा लांबचा पल्ला गाठायचा असो, सर्वसामान्य प्रवासी रेल्वेला अधिक पसंती देतात. कमी पैशात जास्तीत जास्त पल्ला गाठता येत असल्याने रेल्वेला प्राधान्य देतात. दरम्यान, रेल्वेही प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतं. यासाठीच रेल्वेने प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक 'वंदे भारत' एक्स्प्रेस आणली असून, तिला चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण यामधील काही सुविधांचा प्रवासी गैरवापर करतात आणि नंतर याचं खापर रेल्वेवरच फुटतं. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने असाच एक फोटो शेअर करत नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत रुपनगुडी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. यामधून त्यांनी प्रवासी कशाप्रकारे रेल्वेची सुविधा आणि संपत्तीचा गैरवापर करतात हे दाखवून दिलं आहे.  अधिकाऱ्याने एक फोटो शेअर केला असून त्यात एका जोडप्याने वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मुलांना सीटऐवजी समोर जेवणासाठी उपलब्ध केलेल्या स्नॅक ट्रेवर बसवल्याचं दिसत आहे. 


अधिकाऱ्याने हा फोटो शेअर करताना सोबत लिहिलं आहे की, "वंदे भारतमध्ये तुटलेले किंवा खराब झालेले स्नॅक ट्रे असण्याचं आणखी एक मुख्य कारण. हा फोटो पुरावा दिल्यानंतरही काहीजण मी प्रवाशांवर सर्व खापर फोडत आहे असं म्हणतील". 



हा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल आहे. नेटकऱ्यांनी सार्वजनिक संपत्ती अशाप्रकारच्या बेजबाबदार गैरवर्तनाने खराब करण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. एका युजरने कर्मचाऱ्यांनी तात्काळ अशा प्रवाशांना रोखण्याची गरज बोलून दाखवली. तसंच लहान बाळं असतील तर ठीक पण ही मोठी मुलं दिसत आहेत. 2 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी वेगळी सीट हवी असंही त्याने सुचवलं आहे. 


तर दुसर्‍या एका युजरने सुचवलं की, “आदरणीय सर, प्रत्येक सीटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा. रेल्वे विभागाला प्रवास संपेपर्यंत क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक किंवा काही हमी ठेवू दे. जर एखाद्या प्रवाशाने नुकसान केले, तर त्याच्याकडून तो दंड तात्काळ वसूल करता येईल" 


एका युजरने आपला अनुभव शेअर करत सांगितलं आहे की, “हे काही नाही. मी लोकांना त्यांचे जड सामान ट्रेवर लोड करताना पाहिले आहे. आणि, जर तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते उलट आपल्यालाच हे कशासाठी आहे असं विचारतात".