त्याच्या प्रसंगावधानामुळे वाचवले व्यक्तीचे प्राण, समोरुन ट्रेन येताच रेल्वे कर्मचाऱ्याची धाव... पाहा व्हिडीओ
सध्या पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाजवळ एक विचित्र प्रकार घडला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येत राहातात. जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तर येथे असे काही व्हिडीओ समोर येतात, जे आपल्या अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचत आहे. हा एका रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये काही सेकंदाच्या फरकाने एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहे.
आपल्याला हे माहितच आहे की, अनेकदा रेल्वे स्टेशनवर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ओव्हर ब्रीजऐवजी लोक रुळांवर उतरून दुसऱ्या बाजूला जातात. पण ते जीवघेणेही ठरू शकते.
सध्या पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाजवळ असाच प्रकार घडला ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक या रेल्वे कर्मचाऱ्याचे कौतुक करत आहेत.
पश्चिम मिदनापूरच्या खरगपूर रेल्वे विभागातील बालीचक स्थानकावर गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. जिथे रेल्वे कर्मचारी सतीश कुमार यांच्या सतर्कतेमुळे आणि अदम्य धैर्यामुळे एक व्यक्ती रेल्वे अपघातातून वाचली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, या स्टेशनवर फारशी वर्दळ नाही. दरम्यान, रेल्वे कर्मचारी सतीश कुमार मालगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी फलाटावर येतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान अचानक त्याची नजर रेल्वे ट्रॅकवर पडते आणि तो सरळ पळू लागतो.
खरंतर रेल्वे रुळावर कोणीतरी पडतं, ज्याला वाचवण्यासाठी सतीश कुमार धावला. यानंतर त्याने आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर उडी मारली आणि त्या व्यक्तीला तेथून दूर नेले.