मुंबई : महाराष्ट्रात पूर ओसरत असतानाच आता भारताच्या उत्तरेकडे असणाऱ्य़ा राज्यांमध्ये पुराचं थैमान पाहायला मिळत आहे. उत्तर काशीसोबतच हिमाचल प्रदेशातही मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी भूस्खलनही झालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार लाहौल स्पितीपासून कुल्लूपर्यंत सर्व भाग पुरामुळे प्रभावित झाला आहे. ज्यामध्ये कुल्लू येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेने घटनास्थळाचे फोटो प्रसिद्घ करत परिस्थिती अधिक माहिती दिली. ज्यानुसार, मनाली आणि कुल्लूदरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाचं नुकसान झालं आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. 




बियास नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे कुल्लूतील बकारथच भागात रविवारी अडचणीची परिस्थिती उदभवली होती, ज्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्या ठिकणी असणाऱ्या प्रवाशांना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढल्याची माहिती आहे. दरम्यान, रविवारी हिमाचल आणि उत्तरकाशीच्या सीमालगतच्या भागात सहाजणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. 



प्रवासी अडकले


बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात 'बीआरओ'कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भूस्खलन झाल्यामुळे किलाँग आणि सिस्सूदरम्यानच्या रस्त्यावर जवळपास चारशे प्रवासी अडकले आहेत. तर, लाहौल स्पिती भागात येणाऱ्या छोटा दरा, ग्रम्फू या ठिकाणहून आतापर्यंत दीडशे प्रवाशांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात आलं आहे. ज्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.