Video: CNG, LPG टँकरची समोरासमोर धडक, अग्नितांडवात 40 गाड्या खाक; अनेकांचा मृत्यू
Rajasthan Road Accident Many Dead 40 Vehicles Charred In Fire: सोशल मीडियावर या भीषण अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
Rajasthan Road Accident Many Dead 40 Vehicles Charred In Fire: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये आज (20 डिसेंबर रोजी) सकाळी एक भीषण अपघात घडला. येथे एका एलपीजी आणि सीएनजी ट्रकची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 40 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जयपूरमधील सवाई मानसिंह हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
नक्की घडलं काय?
एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये झालेल्या धडकेनंतर लागलेल्या आगीत या दोन ट्रकच्या आजूबाजूला असलेली वाहनेही जळून खाक झाली. या गाड्यांचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत. पोलीस आणि प्रशासनाबरोबरच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर मोठ्या शर्थीने नियंत्रण मिळवलं. मात्र आग विझेपर्यंत दोन्ही ट्रकसहीत आजूबाजूची बरीच लहान-मोठी वाहने जळून खाक झाली होती. सकाळी सहा वाजता अपघात झाल्यानंतर लागलेली आग विझवण्यासाठी 3 तासांहून अधिक वेळ लागला. सकाळी 9 च्या आसपासही काही गाड्यांची आग विझवण्याचं काम सुरु होतं. हा अपघात भांकरोटा परिसरामधील एका खासगी शाळेजवळ झाला.
20 हून अधिकजण 50 टक्के भाजले
सदर अपघातामध्ये लागलेली आग अपघातग्रस्त वाहनांमधील नैसर्गिक वायूमुळे अधिक भडका उडाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती. आग विझवल्यानंतर घटनास्थळावर केवळ गाड्यांचे सांगाडे शिल्लक असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नक्की वाचा >> पुण्याहून कोकणात जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला ताम्हीणी घाटात अपघात; चौघांचा मृत्यू
राजस्थानमधील मंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्घटनेची दाहकता पाहून जवळच्या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली. 40 जखमींपैकी जवळपास 50 टक्के जखमी हे 50 टक्क्यांहून अधिक भाजल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री जखमींच्या भेटीला
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही वेळामध्येच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सवाई मानसिंह हॉस्पीटलमध्ये जखमींची चौकशी करण्यासाठी पोहोचले.
जिल्हाधिकारी म्हणाले 40 गाड्या जळून खाक
आग विझवल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक पहाणीमध्ये 40 गाड्या या अपघातात जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी यांनी, "जवळपास 40 गाड्या जळून खाक झाली आहे. मदतकार्य सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे," असं सांगितलं.