जयपूर: राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस नेते सी.पी. जोशी यांच्या विधानामुळे धार्मिक रंग चढला आहे. हिंदू धर्माविषयी बोलण्याचा हक्क केवळ ब्राह्मणांनाच आहे. मग नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्यासारखे नेते ब्राह्मण नसूनही हिंदू धर्माविषयी का बोलतात, असे आक्षेपार्ह विधान जोशी यांनी केले होते. जोशी यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओत सी.पी. जोशी यांनी म्हटले आहे की, कोणाला उमा भारती किंवा साध्वी ऋतंभरा यांची जात माहिती आहे का? या देशात हिंदू धर्माविषयी कोणाला माहिती असेल तर ते पंडित आणि ब्राह्मण आहेत. मात्र, लोधी समाजाच्या उमा भारती किंवा मोदी हेदेखील आजकाल हिंदू धर्माविषयी बोलायला लागले आहेत. ब्राह्मणांना हिंदू धर्माविषयी काहीच कळत नाही, असा सर्वांचा समज झालाय. त्यामुळे हा देश चुकीच्या मार्गाने चालला आहे, असे जोशी यांनी म्हटले होते. 


जोशी यांच्या या विधानानंतर साहजिकच विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. या वक्तव्यावरून विरोधकांनी काँग्रेसला झोडपायला सुरु केले. अखेर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन सी.पी. जोशी यांचे विधान काँग्रेसच्या सिद्धांतांना अनुसरून नसल्याचा खुलासा केला. त्यांनी यासाठी दिलगिरी व्यक्त करावी, असेही राहुल यांनी म्हटले. 



यानंतर सी.पी. जोशी यांनी तात्काळ ट्विट करत आपली चूक मान्य केली. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले.