निवडणुकीनंतर लगेचच राजस्थानात `या` पदावरून दोन नेत्यांच्या समर्थकांत वाद
राजस्थानमध्ये काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले असून, सहकारी पक्ष राष्ट्रीय लोकदल एका जागेवर विजयी झाला आहे.
जयपूर - राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. पण निवडणुकीचे निकाल लागल्यावर लगेचच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार घोषणाबाजी झाली.
राजस्थानमध्ये काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले असून, सहकारी पक्ष राष्ट्रीय लोकदल एका जागेवर विजयी झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात १०० जागा आहेत. राजस्थान विधानसभेत एकूण २०० जागा आहेत. त्यामुळे विधानसभेत बहुमतासाठी १०१ जागांची आवश्यकता आहे. अशातच बसपच्या नेत्या मायावती यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपने या निवडणुकीत ६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक आकडे आहेत. आता सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, हे ठरवणे पक्षश्रेष्ठींसाठी महत्त्वाचे आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल, याचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी घेतील, असे मंगळवारीच अशोक गेहलोत यांनी जाहीर केले होते. त्यानंतर बुधवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. यावेळीच सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते याबद्दल कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत. तरीही मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक शक्तिप्रदर्शन करत आहेत, हे स्पष्ट होते.
अशोक गेहलोत यांनी यापूर्वीही राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. तर सचिन पायलट हे काँग्रेसच्या तरुण पिढीतील नेतृत्त्वापैकी एक आहेत. दिवंगत नेते राजेश पायलट यांचे ते पुत्र आहेत. राहुल गांधी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.