Rajasthan News: एखाद्यासोबत एकदा का वाईट घटना घडायला सुरुवात झाली माणूस चिंतेत जातो. बराच काळ या घटना घटना घडत राहिल्या तर माणूस चिंतेत राहतो. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडलाय. जिच्यासोबत आयुष्य एकत्र घालवण्याची स्वप्न पाहिली अशी जोडीदार दुसऱ्यासोबत पळून गेली. नशीबाला त्याची परीक्षा अजून पाहायची होती. पोलिसांनी त्याला 5 लाखांची नोटीस बजावली. आता दुष्काळात तेरावा महिना अशी त्याची अवस्था झालीय. कुठे? कसा? घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुरूमध्ये एक तरुण राहतो. रशीद असे त्याचे नाव असून तो 27 वर्षांचा आहे. वॉर्ड 45 सीकर हॉल, सरदारशहर हा त्याचा पूर्ण पत्ता. रशीदचं सायनासोबत 5 वर्षांपुर्वी लग्न झालं होतं. त्यांना 2 वर्षाचा मुलगा आणि 1 वर्षाची मुलगीदेखील होती. वरवर जरी सगळ छान छान दिसत असलं तरी रशीदच्या संसारात काही धड चाललं नव्हतं. त्याचा मुलगा मामाकडे राहायला गेला होता. इथपर्यंत ठिक होतं. पण 2-3 महिन्यापूर्वी बायको सायना तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिचे मांडवा येथील आबिद या तरुणासोबत सूत जुळले. त्यामुळे राशीदला पाठ दाखवून तिने धूम ठोकली. 


आता रशीदला आयुष्यात काय करु आणि काय नको असे झाले होते. बायको गेल्याचे खूप दु:ख होते. त्यात समाज त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता. रविवारचा दिवस, सकाळचे साडे अकरा वाजले होते. काहीतरी करावं असं त्याला वाटत होतं पण काय करावं सुचत नव्हतं.  समोर त्याला पाण्याची टाकी दिसली आणि त्याला सर्वत्र गाजलेला शोले सिनेमा आठवला. मग मागचा पुढचा विचार न करता रशीद टाकीवर चढला. 


पोलीस घटनास्थळी



बघता बघता गाववाले गोळा झाले. त्याला खाली उतरायची विनंती करु लागले. पण रशीद काही ऐकेना. पत्नी सायनाला परत यायला सांगा तर मी उतरेन अशी मागणी तो ठाम करु लागला. रशीदच्या अंगात आलेला विरु काही केल्या जायला तयार नव्हता. अनेक तास हा प्रकार चालला. पण सायना काही आली नाही. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.  पत्नी दुसऱ्या तरुणासोबत निघून गेल्यानंतर रशीद हुतात्मा स्मारकाच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढल्याचे त्यांना समजले होते. तो टाकीवर चढला आणि पत्नीला परत आणण्याची मागणी करू लागला. यानंतर ही माहिती तरुणाच्या सासरच्या मंडळींना देण्यात आली. त्यांच्याशीही बोलणे सुरू झाले. सध्या या रशीदला पाण्याच्या टाकीतून खाली उतरवण्यात आले आहे.


5 लाखांचा दंड 


शहरातील वन विहार कॉलनीतील पाणीपुरवठा विभागाच्या टाकीवर चढून विरोध करणाऱ्या रशीदला कोतवाली पोलिसांनी खाली उतरवून अटक केली. पोलिसांनी आरोपी पती रशीदविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याकडून 5 लाखांचा दंडही वसूल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रशीदने गोंधळ घातल्याने सर्वांची धावपळ झाली. त्यामुळे येथे 24 तास एसडीआरएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याची भरपाई रशीदकडून घेण्यात येणार आहे. 


बायको पळाल्यानंतर आता दंड कुठून भरायचा? असा प्रश्न आता रशीद पडलाय. सध्या रशीद तुरुंगाची हवा खातोय.