मुंबई : राजस्थानमधील पंचायत निवडणुकांच्या निकालांनी सत्ताधारी गेहलोत सरकार आणि काँग्रेससाठी धोक्याची घंटा उभी केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तर सत्तेत असूनही काँग्रेस पंचायत निवडणुकीत मागे राहिली आहे. यामुळे आगामी निवडणुकांसह अशोक गहलोत यांच्यासाठी राजकीय आव्हान वाढू शकतात. कदाचित ही एक छोटी निवडणूक असेल, परंतु यातून एक मोठा राजकीय संदेश जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या पंचायत निवडणुकांच्या निकालामुळे पुढच्या वर्षी तीन विधानसभा जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या चिंता वाढल्या आहेत. राजस्थानातील सहाडा, राजसमंद आणि सुजानगड विधानसभेच्या जागा रिक्त आहेत. सहाडा येथील काँग्रेसचे आमदार कैलाश त्रिवेदी आणि सुजानगड मतदारसंघातील मास्टर भंवरलाल मेघवाल यांच्या निधनानंतर ही रिक्त झाली आहे, तर राजसमंद येथील भाजप आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनानंतर राजसमंद जागा रिक्त आहे. या तीन विधानसभा मतदारसंघातील पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे.


सहाडा विधानसभा समिती अंतर्गत सहाडा पंचायत समितीच्या 15 प्रभागांवर निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी 10 प्रभाग भाजपकडे तर 5 काँग्रेसने जिंकले आहेत. भीलवाडा जिल्ह्यात सहाडा विधानसभा जागा येते, तेथील जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाने एकतर्फी विजय मिळविला आहे.


राजसमंद जिल्हा परिषदेत काँग्रेसचा सूपडा साफ झाला आहे. भाजपने 25 पैकी 17 वॉर्ड जिंकले आहेत तर काँग्रेसला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत. त्याच बरोबर सुजानगड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चुरू जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका भाजपच्या बाजूने राहिल्या आहेत. चुरूच्या 27 प्रभागांपैकी भाजपने 20 तर काँग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसपुढे आता मोठं आव्हान असणार आहे.


पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील सत्ता आणि संघटनेबाबत असंतोष वाढू शकतो. मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नेमणुकांना उशीर झाल्यामुळे आमदार आणि नेत्यांमध्ये आधीच असंतोष आहे. आता त्यात असंतोष वाढू शकतो. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यापासून ब्लॉक स्तरापर्यंत संघटना बांधण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे.


सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदावरून हटविताना राज्यातील ब्लॉक काँग्रेस समित्या विघटन करण्यात आल्या, त्या अद्याप तयार झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डोटासरा आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत एकत्र सत्ता आणि संघटनेचे निर्णय घेत होते. पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता आणि संघटना या दोन्ही स्तरांवर काँग्रेसला अडचण येऊ शकते.


पंचायत निवडणुकीच्या निकालाचा आणखी काही परिणाम अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय लढाईवर होऊ शकेल काय? पायलट यांचे समर्थक या पराभवाला गेहलोत यांना जबाबदार ठरवत हायकमांडकडे तक्रार करतील का याची देखील शक्यता आहे. असे झाल्यास सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतील. ज्याचं मोठं नुकसान काँग्रेसला होईल.