फ्रान्समध्ये शस्त्रपूजेनंतर राजनाथ सिंह राफेलमधून उड्डान करणार
राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारतीय परंपरेनुसार शस्त्रपूजन करणार आहेत. विधिवत शस्त्रपूजेनंतर संरक्षण मंत्री फ्रान्सची कंपनी डसॉल्टकडून खरेदी करण्यात आलेले लढाऊ विमान राफेल संपादन करुन त्यातून उड्डाणही करणार आहेत.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लढाऊ विमान राफेल आणण्यासाठी ३ दिवसीय पॅरिस दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी दसरा आणि भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनी भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान सोपवण्यात येणार आहे.
यावर्षी दसरा आणि भारतीय हवाई सेना दिवस, हे दोन्ही दिवस ८ ऑक्टोबर रोजीच येत असल्याने विमान अधिकृतरित्या प्राप्त करण्यासाठी ८ ऑक्टोबर या दिवसाची निवड करण्यात आल्याचं बोललं जातं.
भारताने लढाऊ जेट निर्माता डसॉल्ट एव्हिएशनसह एक करार केला आहे. त्या करारानुसार, फ्रान्स भारताला ३६ राफेल विमान देणार आहे. त्यापैंकीच एक राफेल विमान आणण्यासाठी संरक्षण मंत्री फ्रान्ससाठी रवाना झाले आहेत.