मोदी सरकार राजपथचे नाव बदलण्याच्या तयारीत; आता या नावाने ओळखले जाणार
या नामकरणासाठी विशेष बैठकीचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) एक मोठे पाऊल उचलत राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ (kartavya pat) करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, एनडीएमसीने राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टाच्या लॉनचे ‘कर्तव्यपथ’ म्हणून नामकरण करण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता आणि परिसर कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाईल. आता राज्यकर्ते आणि प्रजेचे युग संपले आहे, असा संदेश मोदी सरकारला या निर्णयाने द्यायचा आहे. यापूर्वी मोदी सरकारने पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रस्त्याचे नाव बदलले होते. सरकारने रेसकोर्स रोडचे नाव लोककल्याण मार्ग करण्यात आलं.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गुलामगिरीचे कोणतेही प्रतीक असू नये, असे मोदी सरकारचे मत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "देशातून वसाहतवादी मानसिकतेशी निगडित प्रतीके नष्ट करण्याची गरज आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून शतप्रतिशत मुक्तीचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आज प्रत्येक क्षेत्रात भारत जगातील महासत्तांच्या बरोबरीने पुढे जात आहे."
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू हा सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. राजपथच्या दोन्ही बाजूंचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू उद्घाटनासाठी सज्ज आहे.
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचा फर्स्ट लुक सोमवारी लोकांसमोर आला. अव्हेन्यूचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. राजपथजवळील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, चहूबाजूंनी हिरवळ असलेले लाल ग्रॅनाइट वॉकवे, व्हेंडिंग झोन, पार्किंग लॉट आणि चोवीस तास सुरक्षा असेल.