Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण अपयशीच ठरतोय. भारताने अवकाशात उपग्रहे सोडले, चंद्रावर यान पाठवलं, तंत्रज्ञानात प्रगती केली. विज्ञानक्षेत्रात मोठी झेप घेतली तरी अंधश्रद्धा काही जाता जात नाही. आजही काही टक्के लोकं अंधश्रद्धेच्या (Superstition) विळख्यात आहे. आणि याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. एका कुटुंबाने मृत व्यक्तीच्या आत्माला शांती मिळावी यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर तांत्रिकाकडून पूजा करुन घेतली. धक्कादायक म्हणजे ज्याच्यासाठी ही पूजा केली त्या व्यक्तीचा 20 वर्षांपूर्वी मृ्त्यू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या (Rajasthan) बहरोड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. इथल्या जिल्हा रुग्णालयच्या गेटवर या कुटुंबाने एका तांत्रिकाकडून पूजा करुन घेतली. या तांत्रिकाने काही तास तिथे बसून तंत्र-मंत्र करत पूजा केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तांत्रिक पूजा करत असताना त्याला रुग्णालयातील किंवा बाहेरच्या कोणीही रोखलं नाही. तंत्रविद्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गाड्यांमधून 20 ते 25 जणं या प्रकारात सहभागी होते.


काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार भीलवाडा जिल्ह्यातील एका गावात राहाणाऱ्या एका व्यक्तीचा बहरोडमध्ये झालेल्या अपघातात मृत्य झाला. वीस वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पण त्या व्यक्तीचा आत्मा अजूनही भटकत असल्याचा दावा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला. आत्म्याला मुक्ती मिळावी यासाठी मृत व्यक्तीचं कुटुंब एका तांत्रिकाला भेटले. या तांत्रिकाने आत्म्याला मुक्ती मिळायची असेल तर तांत्रिक पूजा करावी लागेल असं सांगितलं. यासाठी काही वस्तू लागणार असल्याचंही तांत्रिकाने सांगितलं.


तांत्रिकाच्या बोलवण्यावर त्या कुटुंबाने विश्वास ठेवला. ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिथे पूजा करावी लागणार असल्याचंही त्या तांत्रिकाने सांगितलं. बहरोडमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्य्क्तीला बहरोड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याच रुग्णालायात मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या गेटवर पूजा करावी लागेल असं तांत्रिकाने सांगितलं. 


रुग्णालयाच्या गेटवर तंत्र-मंत्र
तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्या मृत व्यक्तीचं कुटुंब बहरोड जिल्हा रुग्णालयाकडे आले. त्यानंतर रुग्णालयातील गर्दी कमी होण्याची त्यांनी वाट पाहिली. दुपारच्या सुमारास रुग्णालयातील गर्दी थोडीसी ओसरली. त्यानंतर दुवारी दोन ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान तांत्रिकाने रुग्णालयाच्या गेटवरच सर्व सामग्री मांडली आणि पुजा सुरु केली. आत्माच्या शांतीसाठी सुरु असलेली ही पूजा किमान दोन डझन लोकांसमोर सुरु होती. या दरम्यान रुग्णालयातील कर्मचारीही तिथे दाखल झाले. पण दीड तास सुरु असलेल्या या पूजेवर कोणीच आक्षेप घेतला नाही. इतकंच काय तर कोणी पोलीस तक्रारही केली नाही.


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. त्यानंतर याची चौकशी सुरु झाली. धक्कादायक म्हणजे या रुग्णालयाबाहेर तंत्रविद्या करण्याची ही पहिलीच घटना नव्हती. याआधीही अशा पूजा झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं.