नवी दिल्ली : अखिल भारतीय किसान संघर्ष समिती केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 


शेतकऱ्यांना धोका देणाऱ्या घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पावर टीका करत ते म्हणाले की,  केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आणि त्यांना मातीत घालणारा आहे. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्यात आलेली आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणा शेतकऱ्यांना धोका देणाऱ्या आहेत. प्रत्येक गावात सरसकट शेतकरी कर्जमुक्ती तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.


शेतक-यांच्या आत्महत्येंच काय?


अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या मते शेतकऱ्यांना शेतीमधील आलेल्या संकटापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासंबंधी काहीच उच्चार केलेला नाही. देशातील ६२ टक्के असलेल्या शेतकऱ्यांना २.३६ टक्के अर्थसंकल्पामध्ये वाटा दिलेला आहे, हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा आहे.


निवडणुका असल्याने या घोषणा


दरामध्ये स्थिरता आणण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेमध्ये ९५० कोटी वरून २०० कोटीवर आणून ठेवले आहे. तसेच शेतीमालाला दीड पट हमीभाव देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. केवळ निवडणुका तोंडासमोर ठेवून शेतकऱ्यांना ही घोषणा केली आहे. बियाणे, खते, नैसर्गिक आपत्ती, डिझेल, पेट्रोल, की़टनाशक, कृषि उपकरणासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच पीक विमा फक्त विमा कंपन्यांसाठी लाभदायक आहे, शेतकऱ्यांना त्याचा अजिबात काही उपयोग नाही.