नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि भाजपचे नेते राम माधव यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमकी सुरु होत्या. या वादात आता राम माधव यांनी माघार घेतली आहे. पाकिस्तानने फूस लावल्यामुळेच नॅशनल कॉन्फरन्सने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असे वक्तव्य राम माधव यांनी केले होते. या आरोपामुळे ओमर अब्दुल्ला चांगलेच संतापले. त्यांनी राम माधव यांना हा आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, असे थेट आव्हानही दिले होते.  तुमच्याकडे रॉ, एनआयए आणि आयबीसारख्या यंत्रणा आहेत. याशिवाय, तुमच्याकडे सीबीआयसारखा पिंजऱ्यातील पोपटही आहे. या सगळ्यांची मदत घ्या, नॅशनल कॉन्फरन्सने पाकिस्तानच्या सांगण्यावरून निवडणुकांवर बहिष्कार टाकला, याचा एकतरी पुरावा सादर करा. ते शक्य नसेल तर माफी मागा, असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर राम माधव यांनी ट्विट करत आपले वक्तव्य परत घेत असल्याचे सांगितले. मी तुमच्या देशभक्तीवर कधीच शंका घेतली नाही. मात्र, सत्ता मिळविण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात अचानक निर्माण झालेले प्रेम अनेक शंका उपस्थित करणारे आहे, असे राम माधव यांनी म्हटले. 



जम्मू-काश्मीर विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने नवे सरकार बनवण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली. दरम्यान, पीडीपीनंतर दोन आमदार असलेल्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजपा आणि इतर पक्षांच्या १८ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार बनवण्याचा दावा सादर केला होता. त्यानंतर राजभवनातून शासकीय अधिसूचनेत विधानसभा भंग करण्याची घोषणा करण्यात आली.