नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून विविध हिदू संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी आग्रही भूमिका घेतलेली असताना आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा नसेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर कोणतेही भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला. त्याचवेळी लोकसभा निवडणूक देशातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आणि आरोग्याचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या आधारावरच लढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राम मंदिराच्या प्रश्नी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हे प्रकरण नव्या खंडपीठाकडे देण्याचा आणि पुढील सुनावणी १० जानेवारीला घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नी राहुल गांधी यांनी हे उत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला भ्रष्टाचार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे केलेले नुकसान याच मुद्द्यावर लोकसभेची पुढील निवडणूक लढवली जाईल. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने मी काही बोलणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटल्याचे एक वृत्तसंकेतस्थळाने लिहिले आहे. 


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाच्या निकालानुसारच सोडवला गेला पाहिजे. यामध्ये दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने तोडगा काढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तर बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दाच अग्रस्थानी राहिल, असे म्हटले होते. नितीशकुमार यांनी सुद्धा चिराग पासवान यांच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे. 


राम मंदिरप्रश्नी २०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी १० जानेवारीला नव्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात येईल. त्यावेळीच या खटल्याची पुढील दिशा निश्चित होईल.