कविता शर्मा, प्रयागराज : अयोध्येत राम मंदिर निर्माण होण्याचे मार्ग स्पष्ट दिसत नसल्याने नाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रातील मोदी सरकारवर थेट निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. पुन्हा मोदी सरकार आले तरी राम मंदीर बनण्याबद्दल काही हालचाली होणार नाहीत असेच दिसते असे संघाचे म्हणणे आहे. या संदर्भात सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्यातील कार्यक्रमात थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आणि राम मंदिर 2025 साली बनणार अशी टीका केली. कुंभमेळ्यात हरिद्वारच्या दिव्य प्रेम सेवा मिशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केवळ मंदीरच नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येमध्ये 2025 साली जेव्हा राम मंदिराचे निर्माण होण्यास सुरूवात होईल तेव्हा भारत वेगाने विकास करायला लागेल अशी बोचरी टीका त्यांनी सरकारवर केली. 1952 ला सोमनाथ मंदिर निर्माणानंतर देशाच्या विकासाचे पर्व सुरू झाले असे त्यांचे म्हणणे आहे. राम मंदिर निर्माणाबाबत अनेक आव्हाने पार करण्याची गरज आहे. अयोध्येत एका राम मंदिराचे निर्माण नव्हे तर त्यामागे कोट्यावधी हिंदूची आस्था आणि सन्मान जोडला गेल्याचे त्यांनी सांगितले.


सरसंघचालकांची टीका


कुंभ मेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहाकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदीर मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.  कोणाशीही युद्ध सुरू नाही मग सध्याच्या घडीला भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ? असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी याचे उत्तर देखील दिले आहे. आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे होते असे स्पष्टीकरण देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नागपूरमधील प्रहार समाज जागृती संस्था रजत जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.