राजाप्रमाणे राहत होता राम रहिम, डेऱ्यामध्ये उभारले ताजमहाल, आयफिल टॉवर
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम यांचा सिरसा येथील डेरा हा एखाद्या आलिशान राज महालापेक्षा कमी नाही. झी मीडियाने ७०० एकरच्या या परिसरात प्रवेश मिळविला, त्यावेळी थक्क करणारे चित्र दिसले.
सिरसा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम यांचा सिरसा येथील डेरा हा एखाद्या आलिशान राज महालापेक्षा कमी नाही. झी मीडियाने ७०० एकरच्या या परिसरात प्रवेश मिळविला, त्यावेळी थक्क करणारे चित्र दिसले.
दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला राम रहिम सध्या रोहतक येथील तुरूंगात स्थानबद्ध आहे. तो सिरसा येथील डेऱ्यामध्ये एखाद्या राजा सारखा राहायचा. त्याने जगातील सात आश्चर्य आपल्या डेऱ्यात तयार केले होते.
डेऱ्यामध्ये पॅरिसमधील आयफिल टॉवर, ताजमहाल, डिस्ने लँड यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. तसेच एक मोठे जहाजही या डेऱ्यामध्ये उभे आहे.
डेऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची माहिती देण्यात आली आहे. यात अनेक परोपकारी कामे तसेच सामाजिक कामांसाठी गिनिजने वर्ल्ड रेकॉर्डची प्रमाणपत्रे दिली आहेत. यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबीर, गरजवंताना मदत अशा प्रकारची कामे दाखवून बाबाच्या जाळ्यात फसविण्यात येत होते.
तसेच या ठिकाणी एक फिल्म सिटी आहे. यात बाबा आपले चित्रपट शूट करत असे. या फिल्म सिटीच्या गेटमध्ये कोणीही यात प्रवेश करून नये म्हणून त्याला जीवंत विद्युत वाहक तारा लावल्या आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसात पंजाब आणि हरियाणा सरकार या डेऱ्यात सर्च ऑपरेशन करणार आहेत. यासाठी एका निवृत्त न्यायाधिशाची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे डेऱ्यात आणि डेऱ्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
या सर्च ऑपरेशननंतर आणि तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.