नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला तुरूंगवासाची शिक्षा झाल्यावर चर्चेत आलेले व्यक्तीमत्व म्हणजे हनीप्रीत. पोलीस गेले अनेक दिवस हनीप्रीतच्या मागावर होते. मात्र, तीला पकडण्यात पोलीसांना यश येत नव्हते. पण, अखेर हनीप्रीत लोकांसमोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनीप्रीतने पोलिसांऐवजी मीडियाकडे धाव घेतली. राम रहीमला अटक झाल्यावर तसेच, पोलीस तिच्या मागावर असल्यापासून तिने मीडियासमोर आपली बाजू पहिल्यांदाच मांडली. सूत्रांच्या माहितीनुसार ती आज (मंगळवार, ३ ऑक्टोबर) पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. मीडियासमोर बोलताना हनीप्रीत म्हणाली, 'मी निर्दोष आहे. बाबा राम रहीम यांच्यासोबत माझे बाप-लेखीचे नाते आहे. आमच्या नात्याला उगाच बदनाम केले जात आहे. आपण आपली बाजू हरियाणा उच्च न्यायालयासमोर मांडू. तसेच, या प्रकरणात आपण कायदेशीर सल्ला घेऊ', असेही हनीप्रीतने म्हटले आहे.


राम रहीमसोबतच्या नात्याबाब विस्ताराने सांगताना ती म्हणाली, आमच्या दोघांमधील नाते प्रचंड पवीत्र आहे. आमच्या नात्यावर केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. हनीप्रीत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट पासून ती फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राजस्थान, मुंबईसह नेपाळची वारीही केली. अनेक ठिकाणी छापेमारी केली. पण, ती पोलिसांच्या हाताला लागली नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिने न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता.