सपा आमदार आणि महंत राजुदास यांच्यात हाणमारी; टीव्ही अँकरचाही सहभाग असल्याचा आरोप
Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अचानक हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने आपण वाचल्याचे मौर्य यांनी म्हटले आहे
Ramcharit Manas Controversy : समाजवादी पक्षाचे (SP) नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी रामचरितमानसबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या जोरदार वाद पेटला आहे. रामचरितमानस बकवास आणि दलितविरोधी आहे, असे विधान केल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य हे सध्या चर्चेच्या स्थानी आहे. यावरुन मौर्य यांना जीवे मारण्याचा धमक्याही (Death Threat) देण्यात आल्या आहे. अशातच आता वाद हाणामारीपर्यंत गेला आहे. बुधवारी हनुमानगढीचे स्वामी प्रसाद मौर्य आणि महंत राजुदास यांच्यात एका चर्चेदरम्यान जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. टीव्हीवरील चर्चेच्या कार्यक्रमासाठी आले असताना हा सर्व प्रकार घडला.
रामचरितमानसबाबत केलेल्या वक्तव्यावरुन स्वामी प्रसाद मौर्य आपली भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांचा महंत राजुदास यांच्यासोबत जोरदार वाद झाला. त्यानंतर काही वेळातच दोघांमध्ये हाणामारीसुद्धा झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुसरीकडे दोघांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कसेबसे प्रकरण शांत केले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, या सर्व प्रकारानंतर तपस्वी छावनी मंदिराचे महंत राजू दास, महंत परमहंस दास आणि त्यांच्या समर्थकांनी लखनऊमध्ये तलवारी आणि कुऱ्हाडीने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी लखनऊ पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी पोलीस आयुक्तांकडे मारहाणीची लेखी तक्रार विधान परिषद सदस्याच्या लेटरपॅडवर दिली आहे.
"एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मला लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आलेल्या हनुमानगढीचे महंत राजू दास आणि छावणी मंदिराचे तपस्वी महंत परमहंस दास यांनी बाहेर पडत असाताना माझ्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. माझ्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने माझा जीव वाचला. महंत राजू दास यांनी यापूर्वीही मला मारण्यासाठी 21 लाखांचे बक्षीस ठेवले होते. या टीव्ही चॅनेलचा अँकरही या कटात सहभागी होता," असा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे.
काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?
धर्म कुठलाही असो आम्ही त्याचा सन्मानच करतो. पण धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात येत आहे. याच्यावरच आमचा आक्षेप आहे. रामचरितमानसमध्ये लिहिलेल्या एक चौपाईमध्ये तुलसीदास म्हणतात की, शूद्र हे अधम जातीचे आहेत. यापुढे तुलसीदास म्हणतात की ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका. जर असं त्यांचं म्हणणं असेल तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले होते.