नवी दिल्ली : देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद यांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरन्यायधीश न्यायमूर्ती जे एस केहर कोविंद यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. त्याआधी कोविंद राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण करतील.


कोविंद यांच्या शपथविधीआधी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि कोविंद यांच्यात महत्वाची माहिती आदानप्रदान करण्यासाठी चर्चा होणार आहे. त्यानंतर प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांचं संयुक्त सभागृहात स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि इतर मान्यवर व्यक्ती स्वतः उपस्थित राहतील. १२ वाजून १० मिनिटांनी सुरू होणारा सोहळा १२ वाजून ३५  मिनिटांपर्यंत चालेल. संसदेच्या संयुक्त सभागृहातच प्रणव मुखर्जी कोविंद यांच्याकडे पदभार देतील आणि तिथूनच दोघेही आपआपल्या नव्या निवासस्थानाकडे रवाना होतील.