नवी दिल्ली : महिनाभर रोझाचे उपवास केल्यानंतर बुधवारी रमजान ईद साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशात ईदचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या दिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच विविध ठिकाणी असणाऱ्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नमाजसाठी आलेल्या सर्वांनीच एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छाही दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा भाषांमधून त्यांनी या शुभेच्छा दिल्या. 'रमजान ईदचा हा सण बंधुभाव आणि परोपकाराची भावना अधिक दृढ करतो. अशा या खास दिवशी सर्वांच्याच कुटुंबात सुख- शांती, समृद्धी आणि आनंद नांदो....', असं म्हणत त्यांनी या शुभेच्छा दिल्या. 




रमजानचा महिनाभर रोझाचे उपवास केल्यानंतर या महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. ईदच्या दिवसाच्या निमित्ताने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे. आजच्या दिवशी मुस्लिम बांधव नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत एकमेकांसोबत या दिवसाचा आनंद साजरा करतात.





सौदी अरब आणि इतर आखाती राष्ट्रांमध्ये सोमवारी चंद्रदर्शन झालं आणि त्या ठिकाणी मंगळवारी रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला होता. सहसा सौदी अरबमध्ये ईद साजरा झाल्यानंतर एका दिवसानेच भारतात ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. अशा या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्वांना Zee24Taas.com तर्फे  #EidUlFitr च्या खूप खूप शुभेच्छा. ईद मुबारक!