कर्नाटकमध्ये भाजपचा सत्तेसाठी घोडेबाजार - काँग्रेस
कर्नाटकमध्ये भाजप सत्ता मिळविण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये भाजप सत्ता मिळविण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने मात्र, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये असलेल्या असंतोषाला मोकळी वाट मिळाल्याचा दावा केला आहे. पैशाच्या जोरावर सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. कर्नाटक हे ताजे उदाहरण आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
कर्नाटकमध्ये काल राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसच्या ९ तर जेडीएसच्या ३ आमदारांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार अस्थिर झाले असून ते अल्पमतात येऊ शकते. कर्नाटकातील राजकीय कुस्तीसाठी आता मुंबईचा आखाडा निश्चित झाला आहे. राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे काही आमदार खासगी विमानाने मुंबईत दाखल झालेत. वांद्रे कुर्ला संकुलातल्या सोफिटेल या पंचतारांकीत हॉटेलात हे आमदार सध्या वास्तव्य़ाला आहेत. कर्नाटकातल्या राजकीय घडामोडी आता याच हॉटेलमधून घडतील. आता या हॉटेलमध्ये राज्यातले कोण कोण राजकीय नेते भेट देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकातलं काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आलीय. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा धाडलाय. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. आपला राजीनामा सादर केल्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली असून कुमारस्वामींना बहुमत सादर करण्यास सांगावं, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी सध्या परदेशात असून आज बंगळुरूला पोहोचतील. दरम्यान काँग्रेसे महासचिव वेणूगोपाल यांनाही बंगळुरूत धाडलंय. कुमारस्वामी सरकारमधील काँग्रेस नेता आणि मंत्री डी शिवकुमार यांनी नाराज असलेल्या आमदारांची काल भेट घेतली. दिल्लीतही याबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे. गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा आणि ए. के. अँटनी या बैठकीसाठी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसच्या २ आमदारांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. आजचे राजीनामे मंजूर झाले, तर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येऊ शकते.