Ratan Tata Birthday : इंग्रजीमध्ये असं म्हणतात रॉयल आणि रिचमध्ये फरक असतो. रतन टाटा यांचं व्यक्तीमत्व आणि संपूर्ण जिवनाकडे पाहून हा फरक लक्षात येतो. पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ उद्योजक, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) आज 85 वर्षाचे झाले. प्रख्यात अशा टाटा कुटुंबात त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी त्यांच्या साधेपणाने, प्रेमळ, समाजाप्रती कृतज्ञ स्वभावामुळे आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. रतन टाटा हे मोटिव्हेशनल स्पीकर, ज्येष्ठ समाजसेवक आहेत. देशाच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोलाचे आहे. 


शिक्षण आणि करिअर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९५९ साली कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर १९७५ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. 
वयाच्या 25 व्या वर्षापासून टाटा समूहात आपल्या करिअरची त्यांनी सुरुवात केली. आयबीएमसारख्या बड्या कंपनीमध्ये नोकरी करण्याऐवजी त्यांनी परंपरागत चालत आलेल्या व्यवसाय म्हणजेच टाटा स्टील्सला पुढे घेऊन जाणे पसंद केले.


उल्लेखनीय कामगिरी 


रतन टाटा यांनी देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवली. संपूर्ण भारतीय बनावटीची टाटा इंडिका गाडीची निर्मिती केली. 1998 साली जिनिवा आंतरराष्ट्रीय मोटार शोमध्ये इंडिका गाडीचं प्रदर्शन केल्यानंतर टाटा समुहाला आंतरराष्ट्रीय बाजारात स्वत:चं स्थान प्रस्थापित करता आलं. 


त्यानंतर अॅग्लो-डच स्टीलमेकर कोरस आणि ब्रिटीश लक्झरी ब्रँड लँड रोव्हर आणि जग्वारसोबत टायअप करून या लक्झरीयस गाड्यांची निर्मिती टाटा समुहाने केली. तसेच सर्वसामान्य भारतीयांचं गाडीचं स्वप्न साकारण्यासाठी टाटाने नॅनो गाडीची निर्मिती केली. अवघ्या 1 लाखात गाडी ही संकल्पना विशेष लोकप्रिय ठरली. 


'नमक हो टाटा का टाटा नमक' पासून सर्वसामान्यांचं आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या एअर इंडियाच्या स्थापनेपासून पुन्हा एअर इंडियाची मालकी मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास करत टाटा हे नाव घराघरात पोहचलंय. 


रतन टाटा यांच्याविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी-


  • रतन टाटा यांना आकाशात उडण्याविषयी विशेष आकर्षण होतं. म्हणूनच ते २००७ साली f-16 फाल्कन जेट चालवणारे भारतातले सर्वात पहिले सिव्हिलियन पायलट ठरले त्यांनी तसे लायसन्स मिळवले. 

  • रतन टाटा यांनी गाड्यांची विशेष आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये माझुराटी क्वाट्रापोर्टे, मर्सिडीझ बेन्झ एस क्लास, मर्सिडीझ बेन्झ 500 एसएल, जॅग्वार एफ टाईप या गाड्या आहेत. 

  • रतन टाटा यांनी आत्तापर्यंत कमावलेल्या संपत्तीपैंकी 60-65% संपत्ती दान केली आहे. म्हणूनच जगातील श्रीमंत व्यक्तींच्या फॉर्ब्सच्या यादीत त्यांचं नाव कधीच आले नाही. मात्र तरी देखील त्यांनी गरजूंना आपली संपत्ती दान देऊन श्रीमंतीची नवी व्याख्या प्रस्थापित केली आहे. 

  • रतन टाटा अविवाहित आहेत. त्यांनी देशसेवेमध्ये स्वत:ला झोकून घेतले आहे.

  • प्रत्येक भारतीयाची नाव अभिमानाने उंचावेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. ज्या बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्या हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक्झेक्युटीव्ह सेंटर उभारण्यासाठी त्यांनी 50 मिलीयन अमेरिकन डॉलर दान दिले. तेथील हॉलला टाटा हॉल असे नाव देण्यात आले आहे.

  • रतन टाटा यांचे प्राण्यांवरही विशेष प्रेम आहे. त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्ये कुत्र्यांसाठी एक शेल्टर बनवण्यात आलंय. तसेच त्यांच्याकडे टिटो आणि मॅक्सिमस नावाची कुत्री आहेत. या दोन्ही मुक्या जनावरांवर ते अतोनात प्रेम करतात.