गुजरातच्या जामनगरमध्ये रस्त्यावरच राजकीय वाद झाल्याचा अजब प्रकार घडला आहे. येथे भाजपाच्या तीन मोठ्या महिला नेत्या रस्त्यावरच आपापसात भिडल्या. यामध्ये भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबादेखील होत्या. रिवाबा यांचा सर्वात आधी महापौर बिना कोठारी यांच्याशी वाद झाला. यादरम्यान खासदार पूनम माडम (Poonam Madam) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रिवाबा यांनी त्यांनाही सुनावलं. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियवावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिवाबा जाडेजा यांच्या काही कारणास्तव महापौर बीना कोठारी यांच्याशी एका मुद्द्यावरुन वाद झाला. यानंतर बीना कोठारी यांनी रिवाबा यांना म्हटलं की, "औकातीत राहा, जास्त स्मार्ट बनू नका". हे ऐकल्यानंतर रिवाबा प्रचंड संतापल्या. त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर खासदार पूनम माडम (Poonam Madam) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी रिवाबा यांनी त्यांनाही सुनावलं, आणि तुमच्यामुळेच हा वाद होत असल्याचं म्हटलं. 


भाजपाच्या महिला नेत्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या व्हिडीओत कार्यकर्ता आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तीन महिला नेता आपापसात भिडल्याचं दिसत आहे. जामनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान या तिन्ही नेता भिडल्याची माहिती मिळाली आहे. 



रिवाबा यांनी खासदार पूनम माडम यांना म्हटलं की, तुम्हीच हे मुद्दे पेटवले आहेत आणि आता आग विझवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी माझ्यासाठी स्मार्ट, ओव्हरस्मार्ट अशा शब्दांचा वापर केला असून मला त्याच्याने काही फरक पडत नाही. 


या वादानंतर रिवाबा यांनी सांगितलं की, आपल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पालिकेतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम 9 वाजता सुरु होणार होता. पण पूनम माडम 10.30 वाजता पोहोचल्या. श्रद्धांजली वाहताना त्यांनी चप्पल घातलेलीच होती. जेव्हा माझी वेळ आली, तेव्हा मी चप्पल काढली. याचं कारण मी सैनिकांचा सन्मान करते. 


रिवाबा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मी चप्पल काढत होती, तेव्हाच त्यांनी माझ्यावर कमेंट करत म्हटलं की, देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही अशा कार्यक्रमांमध्ये चप्पल काढत नाही. पण कदाचित त्यांना याची माहिती नसावी. खासदारांच्या या कमेंटमुळे मला राग आला. आत्मसन्मानाचा मुद्दा येतो तेव्हा मी अशा कमेंट ऐकून घेऊ शकत नाही.