मोठी बातमी: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जांचे हप्ते स्वस्त होणार असल्याने सामान्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी अपेक्षेप्रमाणे रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. त्यामुळे ६ टक्क्यांवर असणारा रेपो रेट आता ५.७५ इतका झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट अनुक्रमे ५.५० आणि ६ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने एकमताने हा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या कार्यकाळात झालेली ही सलग तिसरी व्याजदर कपात ठरली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात झाली होती. याचा अर्थ गेल्या सहा महिन्यांत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट एकूण ०.७५ टक्क्यांनी घटवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक पार पडली. त्यामुळे आजच्या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे या पतधोरणात व्याजदरात कपात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ही अपेक्षा अखेर खरी ठरली असून त्यामुळे उद्योग जगतामध्ये सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जांचे हप्ते स्वस्त होण्याची शक्यता असल्याने सामान्यांनाही मोठा दिलासा मिळेल. मात्र, या रेपो रेटच्या कपातीनंतर बँका प्रत्यक्षात आपले व्याजदर किती प्रमाणात कमी करणार, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
दरम्यान, या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने देशाचा आर्थिक वृद्धी दर (जीडीपी) ७ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वीच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात ७.२ टक्के दराने विकास करेल, असे म्हटले होते. तसेच रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना फायदा मिळवून देण्यासाठी RTGS आणि NEFT व्यवहारांवरील शुल्कही हटवले आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांना ज्या दराने पतपुरवठा केला जातो त्याला रेपो रेट संबोधले जाते. रेपो रेट कमी झाल्याने बँकांना गृहकर्ज, पर्सनल लोन आणि वाहन कर्जासाठी कमी दरात पतपुरवठा करणे शक्य होते. त्यामुळे रेपो दरातील कपातीचा थेट परिणाम या कर्जांच्या हप्त्यांवर होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट आहे. यामध्ये रिझर्व बँक वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.