आरबीआय गव्हर्नर कोरोना पॉझिटीव्ह, आयसोलेट राहून करणार काम
शक्तिकांत दास यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. पण विलगीकरणात राहुनही रिझर्व बॅंकेचे काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.इतरांपासून स्वत:ला दूर ठेवून काम करत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. कोविड १९ चे लक्षण वाटत नाहीत पण त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केलंय.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. बाह्य लक्षणांनी असं वाटत नाहीय. माझी तब्येतही ठीक आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्यांना सतर्क करु इच्छितो. लोकांपासून दूर राहुन मी काम सुरु ठेवेन असे ट्वीट शक्तिकांत दास यांनी केले. सर्व डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन संपर्कात राहीन असेही ते म्हणाले. रिझर्व बॅंकेत बीपी.कानूनगो, एमके जैन, एमडी पात्रा आणि एम राजेश्वर राव हे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.
अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार सुस्थितीत राहण्यासाठी ते लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात विशेष सक्रीय राहीले. कोरोना संकटातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पारंपारिक तसेच अपारंपारिक पद्धतींची मदत घेतली.
देशाची अर्थव्यवस्था सुधारतेय
केंद्रीय बँक आणि सरकारच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिकदृष्ट्या सुधारण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे गव्हर्नर म्हणाले. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या ५८५ व्या बैठकीचे अध्यक्षस्थान त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूषविले. या बैठकीत आर्थिक परिस्थिती आणि इतर आव्हानांवर चर्चा झाली.