नवी दिल्ली: उर्जित पटेल यांच्यासारखे लोक सरकारविरोधात ठामपणे उभे राहत असल्याचे पाहून मला अभिमान वाटत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेचे  गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे रक्षण करत होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. सरकारला स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडील पैसे हवेत. मात्र, सरकारच्या या कार्यपद्धतीविरोधात सर्वच क्षेत्रातील लोक एकत्र येत आहेत, हे पाहून मला अभिमान वाटत असल्याचे राहुल यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा: शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर?


याशिवाय, राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याबद्दल उर्जित पटेल यांची पाठही थोपटली. तुम्ही मि.५६ यांच्यापासून रिझर्व्ह बँकेला वाचवण्यासाठी तुम्ही अखेर पुढे सरसावलात, हे चांगले झाले. यासाठी उशीर झाला असला तरी हरकत नाही. भारतीय जनता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला देशातील संस्थांवर कधीच ताबा मिळवून देणार नाहीत, असे राहुल यांनी सांगितले. 


अधिक वाचा: मोदींनी उर्जित पटेलांना थांबवावे, अन्यथा अर्थव्यवस्थेला फटका बसेल- स्वामी





दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी रात्री उर्जित पटेल यांचा राजीनामा मंजूरही केला. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून उर्जित पटेल यांचे कौतुक केले. भविष्यात आम्हाला उर्जित पटेल यांची खूप मोठी उणीव जाणवेल. डॉ. उर्जित पटेल हे अत्यंत प्रतिभावान अर्थतज्ज्ञ होते. त्यांना व्यापक अर्थशास्त्रीय समस्यांची खोलवर जाण होती. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एक विशिष्ट दिशा दिली, असे मोदी यांनी सांगितले.