नवी दिल्ली - जर तुम्ही कोणतेही बिल चुकते करण्यासाठी किंवा एखाद्याला पैसे देण्यासाठी पेटीएम, मोबीक्वीक यासारख्या ऍप आधारित ई वॅलेटचा वापर करीत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अधिकाधिक लोकांनी रोकड पद्धतीने व्यवहार करण्याऐवजी ऍप आधारित ई वॅलेटचा वापर करावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे या स्वरुपाच्या व्यवहारांची सुरक्षितता वाढविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही नवे निर्णय घेतले आहेत. आता यापुढे पेटीएम, मोबीक्वीक यासारख्या ई वॅलेटना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसारच त्यांना भारतात व्यवसाय करावा लागेल.


याआधी २०१७ मध्ये रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये ई वॅलेटचे नियंत्रण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या हातात नसल्याचे म्हटले होते. या ई वॅलेटना त्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी एका प्रमुख बॅंकेची मदत घेण्याचे निर्देश २००९ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने दिले होते. या ई वॅलेटवर सुरू करण्यात आलेले खाते ग्राहकाने ज्या बॅंक खात्याशी जोडलेले आहे. त्याच बॅंकेचे हे खात असल्याचे २००९ च्या निर्देशांनुसार निश्चित करण्यात आले होते. म्हणजे संबंधित व्यवहार त्याच बॅंक खात्याशी जोडण्यात येतील आणि ग्राहकांना त्या आधारेच आवश्यक कायदेशीर पावले उचलता येतील, असे निश्चित करण्यात आले होते. पण यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. ई वॅलेटचे स्वतंत्र रुप मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या पद्धतीने व्यवसाय करावा, यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया काही मार्गदर्शक सूचना करेल आणि त्या सर्व ई वॅलेट कंपन्यांवर बंधनकारक असतील.