दुचाकीवर लिहिले `खरा मर्द हेल्मेट वापरत नाही`, पोलिसांनी दाखवला खाकीतला हिसका
एका दुचाकीस्वार महाभागाने आपल्या गाडीवर लिहिले होते `नो हेल्मेट - मुझे असली मर्द की तरह मरना पसंद है`. विशेष असे की, असे वाक्य दुचाकीवर लिहून तो हैदराबादमध्ये शहरभर फिरत होता.
मुंबई : आपल्या वाहनावरती हौसेखातर काही वाक्ये लिहिन्याचा अनेक मंडलींना भलताच सोस. पण हाच सोस एका महाभागाला चांगलाच महागात पडला. जेव्हा त्याला पोलिसांनी खाकीतला हिसका दाखवत कायद्याची भाषा शिकवली. प्रकरण आहे हैदराबाद येथील. येथील एका दुचाकीस्वार महाभागाने आपल्या गाडीवर लिहिले होते 'नो हेल्मेट - मुझे असली मर्द की तरह मरना पसंद है'. विशेष असे की, असे वाक्य दुचाकीवर लिहून तो हैदराबादमध्ये शहरभर फिरत होता. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचे या दुचाकीकडे लक्ष गेले.
छायाचित्र केले व्हायरल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादू हरिकृष्ण रेड्डी असे या तरूणाचे नाव आहे. हैदराबादच्या वाहतूक पोलिसांनी या तरूणाविरोधात कारवाई केली. पोलिसांनी या तरूणाकडून कायद्यानूसार योग्य त्या रकमेचा दंड तर वसूल केलाच. पण, त्याच्या दुचाकीचे छायाचित्र काढून फेसबुकवरही पोस्ट केले. हे छायाचित्र समाजमाध्यमांत (सोशल मीडिया) व्हायरल झाले आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये लिहिले की, 'आम्हाला प्रचंड दुख: होते आहे मिस्टर कृष्णा रेड्डी, आम्ही आपल्याला असे मरू देणार नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपण खऱ्याखुर्या मर्दासारखेच जीवंत रहा. त्यासाठी कृपया हेल्मेट वापरूनच गाडी चालवा.'
तब्बल सात वेळा केले कायद्याचे उल्लंघन
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या पहाणीनुसार, सादू रेड्डी नामक हा तरूण अनेक वेळा वाहतूक कायद्याचे उल्लंघन करत आहे. विना हेल्मेट गाडी चालवल्याबद्धल पोलिसांनी या युवकावर सात वेळा कारवाई केली आहे. तर, हाच तरूण गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलताना पोलिसांना तीन वेळा सापडला आहे. तेलंगाना राज्य पोलिसांनी ई-चलन रेकॉर्डनुसार या तरूणाला चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करण्याबाबतही दंड आकारला आहे.
प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी या तरूणाकडून २ हजार ६२५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.