कर्नाटकातला `सत्ता`गेम : राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल
राजभवनातून निघाल्यानंतर हे आमदार थेट बंगळुरूच्या `हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड` विमानतळावर दाखल झाले
मुंबई : कर्नाटकात काँग्रेस - जेडीएस आघाडीचं सरकार संकटात आहे. दोन्ही पक्षाच्या एकूण १४ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे धाडलेत... त्यानंतर राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजपा घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून भाजपानं मात्र काँग्रेस आणि जेडीएसमध्ये असलेल्या असंतोषाला मोकळी वाट मिळाल्याचा दावा केलाय.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिलेले सर्व आमदार विमानानं मुंबईत दाखल झालेत. राजभवनातून निघाल्यानंतर हे आमदार थेट बंगळुरूच्या 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' (Hindustan Aeronautics Limited - HAL) विमानतळावर दाखल झाले. इथून एका खास विमानानं हे आमदार मुंबईसाठी रवाना झाले. रात्री ८.०० वाजल्याच्या सुमारास काँग्रेस आणि जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल झाले. तर काँग्रेसचे रामलिंग रेड्डी, एसटी सोमशेखर आणि मुनिरत्ना हे तीन आमदार अजूनही बंगळुरूमध्येच आहेत.
या आमदारांसाठी पवईच्या रेनेसेन्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सोफिटेल आणि ताज हॉटेल बुक करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, हे आमदार सोफिटेल हॉटेलमध्ये दाखल झालेत.
दुसरीकडे, या संकटावर काँग्रेसची दिल्लीत एक आपात्कालीन बैठक पार पडली. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या बैठकीसाठी हजर होते. पी चिदंबरम, रणदीप सुरजेवाल, ज्योतिरादित्य सिंधिया यांसारखे नेते बैठकीत सहभागी झाले होते. 'ज्या आमदारांनी राजीनामे दिलेत ते काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते राहिलेत. ते अजूनही आपल्या निर्णयावर विचार करतील' असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी म्हटलं. तर रणदीप सुरजेवाला यांनी यामागे भाजप कारणीभूत असल्याचं म्हटलंय.
कर्नाटकातलं काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आलंय. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा धाडलाय. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. उद्या सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. आमदारांनी अध्यक्षांच्या सचिवांकडे आपला राजीनामा सादर केलाय. राजीनामा दिल्यानंतर आमदारांनी राज्यपालांकडे कुमारस्वामींना बहुमत सादर करण्यास सांगावं, अशी मागणी केलीये. दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी सध्या परदेशात असून उद्या बंगळुरूला पोहोचतील.