मुंबई : Mission 2024 : 2024च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदाच 10 बिगर काँग्रेस आणि भाजप मुख्यमंत्री एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेस विरोधात प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. (Regional political parties) पडद्याआड सुरू असलेल्या या हालचाली आता दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे एम. के. स्टॅलिन यांच्या पुढाकाराने एक परिषद बोलावण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम रेटण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव 30 मार्चला दिल्लीत दाखल होत आहेत. 


देशात भाजपपुढे मोठा पर्याय उभा करण्याच्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. देशातील 10 राज्यांच्या मुख्यमंत्री संभावीत आघाडीत सहभागी होण्याची चर्चा सध्या सुरु आहे. भाजपला नवा पर्याय उभा करण्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तशा हालचाली सुरु केल्या आहेत. त्याआधी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता.


यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी होण्याच्या चर्चा आहे.