संघर्ष धीरुभाई अंबानींनाही चुकला नाही; अवघ्या 500 रुपयांच्या बळावर कसं उभारलं 6600000000000 कोटींचं साम्राज्य?
Dhirubhai Ambani Death Anniversary: भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावं मोठ्या आदरानं घेतली जातात. याच नावांमध्ये अग्रस्थानी होणारा उल्लेख म्हणजे धीरुभाई अंबानी यांचा.
Dhirubhai Ambani Death Anniversary: 27 डिसेंबर 1932 मध्ये गुजरातमधील चोरवाड येथे जन्मलेल्या धीरुभाई अंबानी यांनी भारतीय उद्योग जगतात मोलाचं योगदान दिलं. भारताच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करणाऱ्यांमध्ये त्यांच्याही योगदानाचा उल्लेख आवर्जून केला जातो. धीरजलाल हीराचंद अंबानी, असं त्यांचं संपूर्ण नाव. त्यांचे वडील एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते. चार भावंडांमध्ये तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या धीरुभाई यांचं कुटुंबं मोठं असलं तरीही कमवणारे हात मात्र कमी असल्यामुळं बालपणापासूनच त्यांना आर्थिक चणचण नेमकी काय असते या वास्तवाचा सामना करावा लागला होता.
16 व्या वर्षी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी...
आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती पाहता वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी धीरुभाई अंबानी यांनी घराबाहेर पाऊल ठेवलं. 1948 मध्ये त्यांनी रमणिकलाल या आपल्या मोठ्या भावाच्या मदतीनं यमनमध्ये 300 रुपये प्रतिमहिना नोकरी सुरु केली आणि तिथंच अरब मर्चंटमध्येही पुढं त्यांनी नोकरी केली. पेट्रोल पंपावर समर्पकपणे काम करणाऱ्या धीरुभाई यांचं काम पाहून त्यांना मॅनेजरपद देण्यात आलं. पुढं 1954 मध्ये ते भारतात परतले आणि 1955 मध्ये खिशात अवघे 500 रुपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली. इथूनच एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
भारतीय बाजारपेठेचं निरीक्षण
मायानगरीत दाखल झालेल्या धीरुभाई यांनी भारतात पॉलिस्टरची अधिक मागणी असल्याचं आणि भारतीय मसाल्यांना परदेशात मागणी असल्याचं ओळखलं. भाड्याच्या घरातून त्यांनी व्यवसायाचा पाया रचला आणि 1958 मध्ये धीरुभाई यांनी चुलत भाऊ चंपकलाल दिमानी यांनी रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशनची स्थापना केली. याच कंपनीत्या माध्यमातून त्यांनी आलं, हळद, वेलची आणि कापड या गोष्टी परदेशात निर्यात केल्या.
बुद्धिचातुर्य आणि व्यवसायकौशल्याच्या बळावर त्यांचा व्यवसाय यशस्वी घोडदौड करू लागला आणि पाहता पाहता ते कोट्यधीश झाले. त्यांनी एकामागून एक नवनवीन कंपन्या सुरु केल्या आणि 2000 मध्ये ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आले. जाणून आश्चर्य वाटेल पण, रिलायन्सची सुरुवात अवघ्या 350 चौरस फुटांच्या खोलीत एक मेज, तीन खुर्च्या आणि दोन सहकाऱ्यांच्या साथीनं झाली होती. आजच्या घडीला हा व्यवसाय इतका विस्तारला आहे की, पाहून अनेकांचेच डोळे दीपत आहेत.
कोकिलाबेन यांची साथ....
1955 मध्येच धीरुभाई यांचा विवाह कोकिलाबेन यांच्याशी झाला. त्यांच्या या संघर्षासह यशात जितका वाटा त्यांच्या मेहनतीचा होता तितकाच वाटा त्याच्या पत्नीच्या साथीचाही होता.
हेसुद्धा वाचा : 7th pay commission : जबरदस्त! सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, 13 भत्त्यांत वाढ; मासिक वेतनात 'इतक्या' रुपयांची भर
अवध्या 500 रुपयांच्या बळावर रिलायन्स उग्योग समुहाचा पाया रचला गेला आणि आज हाच उद्योग समूह जगभरात आपली ओळख प्रस्थापित करत असून, त्याच्या वार्षिक उलाढालीचा आकडा तब्बल 6600000000000रुपयांवर पोहोचल्याचं पाहून अनेकांच्याच भुवया उंचावतात. नशिबाची साथ, प्रचंड जिद्द आणि चिकाटी सोबतच कमालीचा आत्मविश्वास या साऱ्याच्या बळावर काम करत आव्हानात्मक परिस्थितीवर टिच्चून उभ्या राहणाऱ्या धीरुभाईंनी आपल्या जीवनप्रवासातून पुढील कैक पिढ्यांपुढं आदर्श प्रस्थापित केला. 6 जुलै 2002 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी धीरुभाईंनी जगाचा निरोप घेतला, पण कर्तृत्त्वाच्या रुपानं मात्र ते आजही सर्वांच्याच स्मरणात आहेत.