प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा सहभाग नसणार, केंद्राच्या निर्णयावर टीका
अनेक राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली असून याचा निषेध नोंदवला आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर देशातील विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ पाहायला मिळतात. संपूर्ण देशाचे लक्ष या देखाव्यांकडे असते. यावेळेस २६ जानेवारीला महाराष्ट्र कडून छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार हा देखावा सादर करण्यात येणार होता. त्या संदर्भाची तयारी ऑगस्ट महिन्यापासून केली होती. परंतु डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राला सहभाग घेता येणार नाही, असे केंद्र सरकारकडून सांगितले. त्यामुळे राज्यातील जनतेकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली असून याचा निषेध नोंदवला आहे.
महाराष्ट्रासोबत पश्चिम बंगालचा चित्ररथ देखील प्रजासत्ताक दिनी दिसणार नाही. या सर्वामागे राजकीय षढयंत्र आहे का ? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देते असल्याची टीका राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.