Tejaswi Yadav Pregnant Wife Fainted: सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) सध्या लँड फॉर जॉब घोटाळा (Land for Job Scam) प्रकरणी तपास करत आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी केली. ईडीने लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुलींसह, सध्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या घरावरही छापा टाकला. ईडीने तब्बल 12 तास सर्वांची चौकशी केली. दरम्यान, ही चौकशी सुरु असतानाच तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने राजश्री यादव (Rajashree Yadav) बेशुद्ध झाल्या अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी सलग 12 तास चौकशी करत असताना राजश्री यादव यांना बीपीचा त्रास जाणवला. यामुळेच त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. यानंतर त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


लालूप्रसाद यादव यांचा संताप


ईडीने शुक्रवारी फक्त लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली नाही. तर त्यांच्या मुली चंदा, हेमा आणि रागिनी यांच्या घरांवरही छापे टाकले. लालूप्रसाद यादव यांनी ईडीच्या छापेमारीची तुलाना आणीबाणीशी केली आहे. "आम्ही आणीबाणीचा तो काळा काळ पाहिला आहे. आम्ही ती लढाईही लढलो होतो. आज माझ्या मुली, थोटी नातवंडं, गर्भवती सून यांना भाजपाच्या ईडीने 15 तासांपासून बसवून ठेवलं आहे. भाजपा राजकीय लढाई लढण्यासाठी इतक्या खालच्या स्तराला आली आहे का?," असा संताप लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे. 


लालूप्रसाद यादव यांच्या मुलीची पोस्ट


लालूप्रसाद यादव यांची सिंगापूरमध्ये राहणारी मुलगी रोहिणी आचार्य हिने ईडीच्या छापेमारीनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. "आम्ही हा अन्याय लक्षात ठेवू. सर्व काही लक्षात ठेवलं जाईल. माझ्या बहिणी, छोट्या मुलांनी काय गुन्हा केला आहे? माझ्या गर्भवती वहिनीने काय चूक केली आहे? सर्वांना का त्रास दिला जात आहे? सर्वांनाच आज सकाळपासून त्रास दिला जात आहे. लालू-राबडी कुटुंबाने या दंगलखोरांसमोर झुकण्यास नकार दिला ही एकमेव चूक आहे. वेळ आळ्यावर याचं उत्तर दिलं जाईल," असा इशारा तिने दिला आहे. 


जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआय सतत लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाची चौकशी करत आहे. लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि मोठ्या मुलीला समन्स मिळाल्यानंतर 15 मार्च रोजी सीबीआय विशेष न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली आणि पाटण्यात लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांची चौकशी केली आहे. 


लँड फॉर जॉब्स हा घोटाळा नेमका काय आहे? 


लँड फॉर जॉब्स म्हणजे जमिनीच्या मोबदल्यात नोकरी हे 14 वर्षं जुनं प्रकरण आहे. तेव्हा केंद्रात युपीए सरकार होतं आणि लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. सीबीआयच्या आरोपानुसार, सर्वात आधी उमेदवारांना रेल्वेत ग्रुप डी पदावर पर्यायी म्हणून भरती करण्यात आलं. या उमेदवारांच्या कुटुंबीयांनी जमिनीचा व्यवहार केल्यानंतर त्यांना कायमस्वरुपी करण्यात आलं. रोखीत या जमिनींचा व्यवहार झाला होता. म्हणजेच, लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाने पैसे देऊन या जमिनी खरेदी केल्या होत्या. या जमिनी फार कमी किंमतीत खरेदी करण्यात आल्या असा सीबीआयचा दावा आहे.