युपीनंतर आता बिहारमध्ये ही लागणार काँग्रेसला झटका?
सपा-बसपानंतर आता हा पक्ष ही देणार भाजपला धक्का
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी करत काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता आणखी एका राज्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनी काँग्रेसला या आघाडीतून बाहेरच ठेवलं. आरजेडी नेता आणि लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव रविवारी अचानक लखनऊला पोहोचले. तेजस्वी यादव यांनी येथे बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेतली. त्य़ानंतर सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ते भेटणार आहेत. तेजस्वी यादव अचानक त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
तेजस्वी यादव यांनी सपा-बसपाच्या आघाडीवर आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आता एकही जागा मिळणार नाही. यूपी आणि बिहारमधून भाजपचा सुपडा साफ होईल. मायावती यांच्य़ाकडून मार्गदर्शन मिळावी अशी माझी इच्छा आहे. सपा-बसपा आघाडीमुळे लोकांमध्ये ही आनंदाचं वातावरण आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी महाआघाडीमध्ये काँग्रेस १६ जागांची मागणी करत आहे. पण आरजेडी यासाठी तयार नाही. अखिलेश यादव आणि मायावती यांच्या आघाडीनंतर आणि काँग्रेसला या आघाडीपासून लांब ठेवल्यानंतर आरजेडी देखील असाच विचार करते आहे. आरजेडीने काँग्रेस पुढे १० जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. बिहारमध्ये जर काँग्रेस १६ जागांवर ठाम राहिली तर येथे महाआघाडी होणं कठीण होणार आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश मधील राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. पण तेजस्वी यादव काँग्रेसला सोडून इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेऊ शकतात. तेजस्वी यादव लखनऊनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी १९ जानेवारीला कोलकात्याला जाणार आहेत.