एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित याचे निधन
माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचे आज निधन झाले.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी (एन.डी.) यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचे आज निधन झाले. रोहित याली मृतावस्थेतच दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात आणण्यात आले. दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत तो वास्तव्याला होता. दरम्यान, एन. डी. तिवारी यांचे गेल्यावर्षी १८ ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते.
रोहित याची आई आणि पत्नीने त्याला रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता रोहित याचा आधीच मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने रोहित याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांचे सांगण्यात आले तरी त्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, रोहित याने २००८ मध्ये एनडी तिवारी आपले वडील असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. डीएनए चाचणीत रोहित यांचा दावा खरा ठरला होता. त्यानंतर २०१४ मध्ये रोहित शेखर यांच्या आईशी तिवारी यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी विवाह केला होता. रोहित याने जानेवारी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. वर्षभरापूर्वीच त्याने अपूर्वा शुक्ला यांच्याशी विवाह केला होता.